जळगाव शहरातील समता नगर भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या चिंताजनक बाब झाली आहे. जळगाव, रावेर नंतर पुन्हा जळगाव शहरातच एका १६ वर्षीय तरुणीने गळफास घेतला. सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी तिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण अजून अस्पष्ट आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिया संदीप बनसोडे (वय १६, समता नगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, एक मोठी व एक लहान बहीण, आजी, आजोबा, काकू यांच्यासह राहते. आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. दिया हिने बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य जेवण करीत असताना मागील खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तिला तत्काळ खाली उतरविले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी ती बेशुद्धावस्थेत व गंभीर होती. चार दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते.
सोमवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालविली. तिचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दिया ११ वि इयत्तेत शिकत होती. ती मनमिळावू व हुशार होती. दरम्यान, तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. दियाने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजून आलेले नाही. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.