आत्महत्या करण्याचा विचार करताय ? थांबा, एकदा समुपदेशकांना भेटाच…
विश्वजीत चौधरी
(विशेष वृत्तांत)
जळगाव (प्रतिनिधी) : आत्महत्या थांबणार तरी आहेत की नाही ? कोवळ्या जीवांसह सर्व वयोगटातील लोकांना स्वतःची जीवनयात्रा का संपवावी वाटत आहे ? हे प्रमाण थांबेल की नाही ? याला मदत व सामाजिक आधार कधी मिळेल ? असे प्रश्न आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त निर्माण झालेले आहेत. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन जनजागृतीसाठी आवाहन केले आहे. पण हे आवाहन आत्महत्या करणाऱ्यांपर्यंत पोहोचणार तरी कसे हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस. या दिवसानिमित्त सर्वत्र विविध जनजागृतीपर उपक्रम प्रशासनातर्फे आणि सामाजिक संस्था तर्फे घेण्यात येत आहेत. मात्र आज मानसिक ताण तणाव खरंच कमी झाला आहे का ? किंवा ज्यांना सारखा तणाव जाणवतोय त्यांना तणाव हलका करण्यास काही मदत मिळत आहे काय ? तर या प्रश्नाचे उत्तर “नाही” असेच आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच शासनाची मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक १४४१६ बाबत हातात फलक घेऊन तसेच रेल्वे रुळाजवळ फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र वस्तुस्थिती नेमकी काय आहे याबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतलीच पाहिजे.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीत टोल फ्री क्रमांक बाबत आवाहन केले
आज तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. प्रौढ इसम देखील आत्महत्या करतात. मात्र गेल्या पंधरा दिवसात तीन अल्पवयीन तरुणांनी देखील आत्महत्या केल्यात हे तर आणखीनच चिंताजनक आणि सुदृढ समाजासाठी चिंताजनक बाब आहे. या गोष्टीकडे कधी कोणी लक्ष देणार आहे काय ? नुकताच दहावीत गेलेला जळगावचा तन्मय, रावेर तालुक्यातील इयत्ता नववीची नंदिनी आणि जळगावतीलच समता नगर येथील दिया या अल्पवयीन तरुणांनी नुकतीच गळफासाने आत्महत्या केली. विद्यालयांमध्ये व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अचूक समुपदेशन किंवा समजून घेणारी अध्यापन प्रक्रिया होते की नाही ? याबाबत देखील खरे प्रश्नचिन्ह आहे.
मुलांना अभ्यास किंवा घरातील प्रश्न याविषयी तणाव विरहित मोकळे वातावरण मिळते की नाही ? तसेच मुलांना त्यांचा तणाव, त्यांची प्रश्न समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून त्यांचे समाधान होते की नाही ? याकडे देखील समाजातील विविध घटकांनी लक्ष दिलेच पाहिजे. काही एकटे पडलेले तरुण ज्यांना कोणी मानसिक आधार नाही, अशांना मात्र आत्महत्या होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यांना वेळीच चांगला मानसिक आधार मिळाला तर त्यांचे आयुष्य वाचून सत्कर्मी लागू शकते. या वृत्तांतासोबत अल्पवयीन मुलांच्या फोटोसहित काही पुरुषांचे फोटो दिले आहेत की ज्यांनी गेल्या २० ते २२ दिवसात आत्महत्या केले आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये १४४१६ या हेल्पलाइनचे काहीच महत्त्व नाही. अनेक वेळा हा नंबर लागत देखील नाही. कधीतरी व्यस्त लागत असतो. मुळात हा नंबर डायल करून आपला तणाव हलका होईल हे नेमके किती जणांना माहिती आहे व समजू शकते ? हाच मुळात खरा प्रश्न आहे. त्या हेल्पलाइनवर जो तणावात आहे त्याचे म्हणणे ऐकले जाते काय ? तसेच ऐकणारी व्यक्ती हे समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञ, मनोविकार तज्ञ असते काय हा देखील खरा प्रश्न आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीबद्दल, “मूर्ख होता तो, कशाला त्याने असे करायचे ?” असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक घरा-दारात किमान एक व्यक्ती अशी आहे की, ज्यांच्या डोक्यावर कायम तणाव आहेच. सरकारी रुग्णालयांमध्ये मानसोपचार तज्ञ, मनोविकार तज्ञ, समुपदेशक यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शासन त्या भरायला तयार नाहीत. त्याचे महत्त्व देखील शासनाला समजत नाही. त्यामुळे आत्महत्या या वाढत चालल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पाहता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे आज दोन मनोविकार तज्ञ, एक मानसतज्ञ आणि एक समुपदेशक आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे तात्पुरत्या तत्त्वावर एक वरिष्ठ निवासी व एक क्लिनिकल समुपदेशक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेमध्ये आजही मनोविकार तज्ज्ञांच्या व समुपदेशकांच्या जागा रिक्त आहेत. सहा वर्षांमध्ये त्या भरल्याच गेलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयात मानसिक आजारी असणाऱ्या रुग्णांची गर्दी भरपूर आहे. त्यांना तपासण्यासाठी डॉक्टरही उपलब्ध आहेत. पण या डॉक्टरांची संख्या नगण्य असल्यामुळे त्यांनाही मर्यादा पडते.
मानसिक आजारी असणाऱ्यांना अखेर सामाजिक मदतीची गरज खूप असते. आधाराची गरज मिळाली तर मानसिक आजारी रुग्ण लवकर बरे होतात. त्यामुळे समुपदेशकांच्या, मनोविकार तज्ञांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत. स्थानिक पातळीवर मानसिक आजारी व्यक्तींसाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ फलक हातात धरून उपयोग नाही तर प्रत्यक्षात कृती देखील केली पाहिजे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.