धरणगाव तालुक्यातील सावदे रोड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यांना नागरिकांनी शासकीय रुग्णालयात् दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
वासुदेव भागचंद पाटील (वय ३५, रा.धारशेरी ता. धरणगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते गावामध्ये आई, वडील, पत्नी, दोन मुले आणि भावासह राहतात. कासट फॅब्रिकेशन येथे वेल्डिंगचे काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी संध्याकाळी ६ वाजता ते काम आटपून घरी परतत असताना सावदे रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली.
या धडकेत ते जबर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान या प्रकरणी पाळधी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. या प्रकरणी पाळधी स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.