पाचोरा शहरात कॉलेज चौकात घडली होती घटना
पाचोरा / जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा शहरामध्ये कॉलेज चौकात शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली होती. या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला आहे तर याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अद्याप अपघाताची नोंद झालेली नाही.
संतोष शिवसिंग परदेशी (वय ३७, रा. गाळण ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मार्केटिंग क्षेत्रात असून त्यावरच कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शनिवारी दि. १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ते कल्याण स्टेशनवरून पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरले.(केसीएन) स्टेशनवर उतरल्यावर गाळण येथे घरी जाण्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट मागितली. या दुचाकीस्वाराच्या सोबत जात असताना कॉलेज चौकात आल्यावर भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या जबर धडकेत दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील संतोष परदेशी यांच्यावर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.(केसीएन)तर दुचाकीस्वार हे कृषी अधिकारी असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर पाचोर्यातीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जळगावात संतोष परदेशी यांचा उपचार सुरू असताना रात्री ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी संतोष परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते. तर अपघाताची कुठलीही नोंद झालेली नाही.
दरम्यान धडक देणारे अवजड वाहन हे वाळूचे डंपर असल्याची माहिती संतोष परदेशी यांच्या नातेवाईकांनी दिली. (केसीएन) त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अंकुश लावावा अशीही मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान गाळण गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.