धरणगाव तालुक्यातील वराड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील मुसळी ते वराड गावादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ममुराबाद येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दिनांक २४ जून रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
बापू जंगलू भील (वय ३८ रा. ममुराबाद ता. जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बापू भील हा पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. विटभट्टीवर काम करून तो उदरनिर्वाह करत होता. सोमवारी दिनांक २४ जून रोजी बापू हा दुचाकीने धरणगावहून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात बापू भिल याचा जागेवर मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.