अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आमोदा फाट्याजवळ भरधाव वाहनाने दिली धडक; अज्ञात चालकाचा शोध सुरू
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील आमोदा फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(ब) व १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश एकनाथ भोळे (वय ३६, व्यवसाय – कलेक्शन ऑफिसर, रा. भूषण कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने प्रवास करत असताना आमोदा फाटा, कानळदा रोड, ता. जि. जळगाव येथे भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर न थांबता पलायन केले. या अपघातात गणेश भोळे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध निष्काळजी व बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









