जळगाव (प्रतिनिधी):- भारतात प्रथमच जळगावच्या अनुभती शाळेला दक्षिण कोरीयामधील जागतिक संमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. अनुभूती शाळेतील दहावीचा विद्यार्थी अथर्व राठोर याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत भारतातील बहूसंस्कृतीवाद – एकत्वम या विषयावर सादरीकरण केले. या परिषदेत १७ देशातील शाळांची निवड करण्यात आली होती. त्याने भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक विकास आणि विदेश धोरण या विषयावर सगळ्यांशी संवाद साधला. सर्व देशांच्या प्रतिनिधींना हे सादरीकरण खूप आवडले.
भारत सोडून या १७ देशात ऑस्ट्रेलिया, सर्बिया, म्यानमार, इंडोनेशिया, जपान, कोरीया, फिलीपाईन्स, न्यूझीलंड, तैवान, भूतान, नेपाळ, कंबोडीया, ब्रुनेई, व्हीएतनाम, कोलंबिया आणि युएसए या देशांचा समावेश आहे. या देशातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, अन्न सुरक्षा, स्थलांतर, बहूसंस्कृतीवाद, आश्रित, हिंसा, आणि मानवी हक्क या त्यांच्या देशातल्या समस्यांंवर चर्चा केली.
या आंतरराष्ट्रीय वेब परिषदेचा मूळ उद्देश तरुणांमध्ये या समस्यांची जाणीव असावी आणि त्यांच्यामध्ये चांगला भविष्यातील उद्याचा काळात संवाद साधण्यास उत्तेजन देणे आहे. कुम्हो शाळेतील विद्यार्थ्यांनी या परिषदेचे संघटन केले आणि जी-यंग जूंग ह्यांनी परिषदेचे संघटक म्हणून काम केले. कुम्हो हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक गाणे आणि समूहनृत्य परिषदेच्या समारोपाआधी सादर केले. आभार प्रदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला.