कासोदा (प्रतिनिधी):- एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. घरमालक पुतणीच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३३ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

आडगाव येथील रहिवासी आणि किराणा दुकान चालक संभाजी युवराज पाटील (वय ४५) हे २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास आपल्या पुतणीच्या लग्नासाठी भडगाव तालुक्यातील गुढे येथे गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. २९ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याचे उघडकीस आले.
चोरीला गेलेला मुद्देमाल:- चोरट्यांनी कपाटातून सोन्याच्या बाळ्या: २ ग्रॅम वजनाच्या (किंमत ६,००० रुपये), सोन्याचे मणी: ४२ मणी, ८ ग्रॅम वजनाचे (किंमत २४,००० रुपये), सोन्याचे ‘ओम’ पान: १ ग्रॅम वजनाचे (किंमत ३,००० रुपये), एकूण किंमत: ३३,००० रुपये वस्तू चोरून नेल्या आहेत.
याप्रकरणी संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(४) आणि ३०५(A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अकील खलील मुजावर करत आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








