विश्लेषण : चोपडा विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा शिवसेना शिंदे गटातर्फे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे हे टक्कर देत आहेत. यंदा दोघांचे पारडे निवडणुकीत जड दिसत असून जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात कौल देणार याकडे आता मतदारसंघात उत्सुकता लागून आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेतर्फे लता चंद्रकांत सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती. यंदा त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे हे लढत देत आहेत. मागील पंचवार्षिकला २०१९ साली लता सोनवणे यांना ७८ हजार १३७ मते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जगदीश वळवी यांना ५७ हजार २ एवढी मते मिळाली होती.
चोपडा विधानसभा मतदारसंघात ३ लाख २६ हजार २८२ एकूण मतदार असून १ लाख ६६ हजार ६ पुरुष तर महिला १ लाख ६० हजार ७७३ आणि ३ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदार संघामध्ये पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी, रोजगार, रस्ते तसेच अतिपावसामुळे शेतीचे झालेले नुकसान असे विविध मुद्दे निवडणुकीच्या प्रचारामध्ये चर्चेला आलेले होते. यंदा प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले असल्यामुळे जनतेचा कौल कोणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.