जामनेर तालुक्यात चार पुरुषांनी घेतला लाभ
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथे प्रथमच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर सम्पन्न झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकडी हे जामनेर तालुक्यातील सर्वात जुने व लौकिक मिळवलेले आरोग्य केंद्र आहे. वाकडी येथे मदर पीएचसी असून परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात बैलगाडीने उपचारासाठी येत असत.१९५८ साली केदारशेठ देहाडराय व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने व आबाजी नाना पाटील यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी ची स्थापना झाली. एकुण तीन वैद्यकीय अधिकारी सह २८ ते ३० जणांचा स्टाफ येथे होता. महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पूर्वीपासूनच आरोग्य केंद्राचा मोठया प्रमाणात लौकिक आहे. डॉ.वाय एच शहा, डॉ.जयश्री पाटील, डॉ.गौतम खिल्लारे, डॉ.महेश जाधव, डॉ.मधुकर चौधरी आदी लौकिक असलेले वैद्यकीय अधिकारी या प्राथमिक आरोग्य केंद्रास लाभले आहेत.
प्रथमच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर सम्पन्न झाले. जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश खान यांच्या यांच्यासमवेत चार पुरुषांवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. काही कारणास्तव पत्नीस काही आजार किंवा अशक्तपणा असल्यामुळे तसेच महिलांचे कुटुंबनियोजन ऑपरेशन मध्ये ७ दिवस ऍडमिट राहावे लागत असल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुरुषांकडून स्वतः वर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिबिर प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ.सागर पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.किरण पाटील,औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील,आरोग्य सहाय्यक विक्रम राजपूत,आरोग्य सहाय्यीका सुरेखा गोसावी,शोभा घाटे,आरोग्य सेवक सुनील बोरसे,स्वप्नील महाजन,हेमंत पाटील,मनोज परदेशी,अनिल सोनवणे,अनंत गंगातीरे,विनोद पाटील,परिचर फुलवंती रबळे व वाहन चालक जावेद तडवी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
यानंतरही वाकडी येथे नियमितपणे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर होणार असल्याचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी सांगितले.