उद्योगाभिमुख कौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञान अन् रोजगाराच्या संधींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (इव्ही) तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना वाहन उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन, उत्पादन प्रक्रिया आणि रोजगाराच्या विविध संधींची माहिती मिळाली.


पुणे येथील राधे टेक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन वाळके किल्लारीकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांना ऑटोमोबाईल संशोधन व विकास, प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, नवीन वाहन संकल्पनांची निर्मिती आणि इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञान क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी टाटा मोटर्स, महिंद्रा ट्रक्स अँड बसेस आणि फोर्स मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे.किल्लारीकर यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान, प्रॉडक्ट डिझाइन, वाहन विकास, जिओमेट्रिक डायमेन्शनिंग अँड टॉलरन्सिंग आणि ऑटोमेटेड गाईडेड व्हेईकल्स यांसारख्या आधुनिक तांत्रिक संकल्पनांची सविस्तर माहिती दिली.
वाहन उद्योगात वेगाने होत असलेले बदल, डिजिटल इनोव्हेशन आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.सैद्धांतिक ज्ञानाला प्रात्यक्षिक अनुभवाची जोडअभ्यासक्रमातील सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात कसा उपयोग होतो, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वाहनांचे डिझाइन, उत्पादन विकास आणि आधुनिक उत्पादन प्रक्रिया यांविषयी अनुभवाधारित मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कौशल्ये विकसित करावीत, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
तांत्रिक ज्ञानासोबत संवादकौशल्य, नवकल्पना, व्यावहारिक दृष्टिकोन आणि सतत शिकण्याची वृत्ती हीदेखील औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांच्या अपेक्षा आणि भविष्यातील करिअरच्या संधी समजून घेण्यास मदत झाली.या उपक्रमाचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन उद्योगाभिमुख बनविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.









