‘अनुभवांना द्या आवाज, खर्या कथांमधून घडवा बदल’; पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, : डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे अतिथी व्याख्यान आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.‘अनुभवांना द्या आवाज, खर्या कथांमधून घडवा बदल’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. हुमैद महाडिक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. हुमैद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणार्या व्यक्तींचे अनुभव सहानुभूतीने ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज आणि कलंक दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमांतर्गत आयोजित पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, भावनिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य जपण्याचे उपाय आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर सर्जनशील व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.अस्मिता जुमडे आणि प्रा. मंजिरी मडावी यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच मानसिक समस्यांचा सामना करणार्या व्यक्तींना आदर, सहकार्य आणि भावनिक आधार देण्याचा संदेश देण्यात आला. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाला महत्त्व देऊन तिचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकणे, हा मानसिक आरोग्यविषयक सकारात्मक बदलाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलता वाढण्यास आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यास मदत झाली.









