नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे चोरटयांनी थेट गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्याची पत्नी योगा करण्यासाठी पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दीपक नाईक यांच्या पत्नी हेमा दीपक नाईक (वय ४४, रा. जाई बंगला, जोशी वाडा हनुमान मंदिराजवळ, हिरावाडी, नाशिक) या गुरुवार दि. १८ रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास योगा करण्यासाठी शक्तीनगर परिसरातून पायी जात होत्या. (केसीएन)अचानक समोरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
या घटनेमध्ये सोनसाखळी खेचताना हेमा नाईक या खाली पडल्याने जखमी झाल्या आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.