जळगावातील मेहरूण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जेईई परीक्षेचा निकाल मंगळवारी दि. १३ रोजी लागला. या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगाव शहरातील मेहरूण येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश गणेश खर्चे (वय १८, रा. जोशीवाडा, मेहरूण, जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आई, वडील, बहिणीसह वास्तव्याला होता. त्याने नुकतीच जेईई परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. परीक्षेत त्याला कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे तो निराश झालेला होता. बुधवारी सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
यश खर्चे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.