धरणगाव ( प्रतिनिधी ) – शेतमजुरांना अश्लिल तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धरणगाव येथील बिपीन जगन्नाथ तिवारी याच्या शेतात काही कामासाठी मुकादमच्या माध्यमातून जाण्यास सांगितले होते. त्यानुसार १० ते १२ महिला, पुरुष मजूर घेऊन ९ ऑगस्टला सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात कामास गेलो. तेव्हा शेतात काम करताना एक महिला मजूर भरलेला डाळींबचा कोट ट्रॅक्टरमध्ये खाली करण्यासाठी गेली.
या वेळी ट्रॅक्टरजवळ उभे असलेले शेत मालक बिपीन तिवारी यांनी त्यांना शिवी दिली. संबंधित महिलेने ही घटना सहकाऱ्यांना सांगितली. त्यांनी तिवारी काका तुम्ही असे का बोलले, असा जाब विचारला असता त्यांनी पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात केली. तसेच धमकी दिली. यानंतर एका शेतमजूर पुरुषालाही जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी शेतमालक बिपीन तिवारी यांच्याविरुद्ध पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. तपास विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेष रावले करत आहेत.