एरंडोल प्रकरणात पीडितांची संख्या झाली आठ, दुसरा गुन्हा दाखल
एरंडोल (प्रतिनिधी) ; तालुक्यातील एका गावातील वस्तीगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण तेथील नराधम काळजीवाहकानेच केल्याचे निष्पन्न झाले होते. आता शनिवारी या प्रकरणात आणखी वाढ झाली असून तीन मुलांनीदेखील त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पीडितांची संख्या ८ झाली आहे. या ३ मुलांना वसतिगृहातीलच इतर ८ मुलांनी गणेश पंडित याचे सांगणेवरून बेदम मारहाण देखील झाली आहे. तसेच, संस्थाध्यक्ष व संचालकांनी त्यांना माहिती असूनही कुठलीही कारवाई केली नाही म्हणून त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला शनिवारी २९ रोजी संध्याकाळी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शिवाजी पंडित असे या नराधम काळजीवाहकाचे नाव आहे. वस्तीगृहातील मुलींची काळजी घेण्याचे काम त्याच्याकडे होते. सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींचे वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाले आहेत. पाच बालिका तेथील वसतीगृहात अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक संभोग देखील केलेला आहे. आता याच कालावधीत आणखी तीन मुलांचेही शोषण त्याने केल्याचे चौकशीत दिसून आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिला अरुणा पंडित यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी २९ रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला ११ वर्षीय पीडित मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यात नराधम गणेश पंडित, संस्थाध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील, त्यांची मुले सचिन व भूषण प्रभाकर पाटील (तिघे रा. ओम नगर, एरंडोल) यांच्यासह वसतिगृहातील ८ अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, होळीच्या वेळेस फिर्यादीला वसतिगृहात पाणी भरले नाही म्हणून नराधम गणेश पंडित याचे सांगणेवरून वसतिगृहातील ८ मुलांनी लाथाबुक्क्यांनी पाठीवर, छातीवर, पोटावर बेदम मारहाण केली आहे. तसेच नराधम गणेश पंडित याने जून २०२३ पूर्वी कधीतरी दुपारच्या वेळी वसतिगृहात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत फिर्यादीचा शारीरिक व लैंगिक अत्याचार केला आहे. फिर्यादीसह आणखी दोघांवर नराधम गणेश याने अनैसर्गिक कृत्य केल्याचेदेखील यावेळी उघड झाले आहे.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा शनिवारी २९ रोजी दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत. संशयित आरोपींपैकी गणेश पंडित हा पोलीस कोठडीत असून ८ अल्पवयीन मुलांना रिमांड होम येथे पाठविण्यात आले आहे. तर पहिल्या घटनेतील सचिव भिवाजी पाटील अद्याप फरार आहे.