जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली जवळील हनुमान मंदिराजवळ भरधाव कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
रफिक हुसेन मेवाती (वय-23) आणि अरबाज जहांगीर मेवाती (वय -20) दोन्ही रा.राणीचे बांबरुड, ता.पाचोरा असे मयत झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रफिक हुसेन मेवाती हा तरुण आपल्या परिवारासह पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे राहायला होता. जळगाव शहरातील मास्टर कॉलनी पेरू विक्रीकरून आपला व्यवसाय करीत होता. सोमवारी ५ डिसेंबर रोजी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच १९ सीएच ४३५९) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय – २१) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ बीजे २१७५) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरिवाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे रात्री उशिरापर्यंत नोंद होण्याचे काम सुरू होते.