यावल ( प्रतिनिधी ) – खासगी नोकरी करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने लॉटरीचे आमिष दाखवत तिची तीन दिवसात ३ लाख ८० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
किनगाव येथील ३८ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी सकाळी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा व्हॉटसॲपवर कॉल आला. त्याने सांगितले की आपल्याला २५ लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. तुमचा खाते क्रमांक आणि फोटो पाठवा. तुमच्या खात्यात रक्कम पाठवायची आहे. त्यावर महिलेने आपल्याला पैसे नको आहेत असे सांगितले व फोन कट केला.
पुन्हा त्यांना फोन आला या महिलेशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने त्यांच्या पतीचे बँकेचे डीटेल्स दिले. त्यानंतर बँक मॅनेजरला १ लाखसाठी १ हजार रूपये असे २५ लाखासाठी २५ हजार रूपये फोन-पेवर पाठवा असे सांगितले त्याने दिलेल्या मोबाईलनंबरच्या फोन-पे वर महिलेने सुरूवातीला २५ हजार रूपये पाठविले. त्यानंतर वारंवार काहीना काही कारण सांगून ३ लाख ८० हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले. पैसे पाठवून देखील परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात २ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो नि दिलीप भागवत करीत आहेत.