दहीहंडीवर स्थान; ६८५ युवतींचा सहभाग; प्रवेश विनामूल्य; कुटुंबीयांसह उत्सव अनुभवण्याची संधी
जळगाव ( प्रतिनिधी ) – भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ चा थरार शनिवारी (दि. ५) शिवतीर्थ मैदानावर रंगणार आहे. नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत हा सोहळा होणार असून, उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवतींनी मानवी मनोऱ्यांचा कसून सराव केला असून, धाडसाचे कौशल्य सादर करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दहीहंडी ज्या उंचीवर असेल, त्याच उंचीवर देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. या खेळाडूंच्या कर्तृत्वातून सहभागी युवतींना प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.


‘युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय,
एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय,
के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल, के. के. इन्स्टीट्यूट आफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी शाळा-महाविद्यालयांतील १५ महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवती सहभागी होणार आहेत. सहभागी युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून, प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे.
स्पर्धा नव्हे, उत्सव; सर्वांना समान संधी
हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून समता आणि समान संधीचा उत्सव असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहभागी सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी मैदानावर १५ दहीहंड्या उभारण्यात येणार असून, त्यावर भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर लावण्यात येणार आहेत.
युवतींसाठी ६३ हजारांची रोख पारितोषिके
मागील वर्षी समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली होती. त्याची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..
उडाण फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, ग्लडियेटर डान्स क्लासेस, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल सांस्कृतिक नृत्य सादर करतील. के के इन्स्टीट्यूट योगा, एकलव्य मल्लखांब अकॅडमी, रुद्र योगा तर्फ रोप मल्लखांब, योग नृत्य सादर करतील. कु. कल्याणी महाजन व श्रीराम गुरूकूल मर्दानी खेळ सादर करतील. नागपुरचे सौ. सुनिता मौर्य महिमा मौर्य हुला हूप नृत्य सादर करतील. पुण्याचे कामत काका हे आपल्या रशियन स्टाईल ने नृत्य करतील.
ढोलवादकांचा दणदणाट अन् लेझर शो
‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादक दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडणार आहेत. मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही उत्सवात सहभाग राहणार आहे. दहीहंडीचा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेवेळी दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. सिमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, स्वागत समितीच्या सदस्या रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, मिनल जैन, हेमांक्षी वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









