बेल्लारी ( प्रतिनिधी ) – कर्नाटकमध्ये भीक मागून गुजराण करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याचे समोर आले आहे गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यात ही घटना घडली .
४५ वर्षीय बसवा उर्फ हुच्चा बस्या यांचं अपघातामध्ये निधन झालं. आयुष्यभर भीक मागून ते गुजराण करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. सोशल मीडियावर देखील यासंदर्भातले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनं आश्चर्य व्यक्त केलं.
ते भीक मागत होते त्या हदगली गावातल्या रहिवाशांसाठी बसवा गुडलक होते. बसवा लोकांकडून अवघा एक रुपया भीक घेत होते. लोकांनी जास्त पैसे घेण्याचा आग्रह करून देखील ते एक रुपया घेऊन उरलेली रक्कम परत देखील करत! बसवा यांना एक रुपया दिल्यानंतर काहीतरी चांगलं घडतं, अशी श्रद्धा लोकांची होती. यामुळे बसवा या भागात प्रसिद्ध झाले होते.
गेल्या आठवड्यात बसवा यांचा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांना यश न आल्यामुळे शनिवारी त्यांचं निधन झालं. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्याशी अनोखं नातं जोडलं गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय व्यक्तींशी देखील बसवा बिनधास्तपणे संवाद साधायचे.