वारली चित्रकला, नैसर्गिक साहित्य आणि भूरूपांच्या प्रतिकृती ठरल्या आकर्षण
जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती, नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर, पारंपरिक वारली चित्रकला, चंद्राचा विस्तृत नकाशा आणि विविध भूरूपांच्या प्रतिकृतींनी या प्रदर्शनात विशेष लक्ष वेधून घेतले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन अतुल जैन, डॉ. भावना जैन यांच्या हस्ते करण्यात आले. संचालिका निशा जैन आणि अंबिका जैन यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती आणि विविध शैक्षणिक नमुन्यांची पाहणी करून कलाकृतींबद्दल कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांनी शिक्षक आणि पालकांचेही अभिनंदन केले. प्रदर्शनास पालक, शहरातील कलाप्रेमींनी भेट दिली. त्यात सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, फरहाद गिमी, अथांग जैन, अन्मय जैन, महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया आदिंचा समावेश होता.
‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून उपयुक्त आणि आकर्षक कलाकृती साकारल्या. नैसर्गिक साहित्याचा वापर करूनही अनेक नावीन्यपूर्ण वस्तू तयार करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पारंपरिक वारली चित्रकलेने संपूर्ण शालेय परिसराला सांस्कृतिक आणि कलात्मक साज चढवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देण्यात आली. प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला तो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला चंद्राचा विस्तृत नकाशा.
या नकाशात चंद्रावरील पर्वत, दऱ्या, विविध भौगोलिक रचना तसेच चांद्रयान आणि अपोलो-११ यांच्या चंद्रावरील उतराईची ठिकाणे दर्शविण्यात आली होती. लहान वयातच विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनातील बारकावे समजून घेत त्यांचेले सादरीकरण केले, लक्षवेधी ठरले. या सोबतच पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या, बेटे आणि द्वीपकल्प अशा विविध भूरूपांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. या प्रतिकृतींच्या माध्यमातून भूगोलातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कला, विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण या विषयांचा सुंदर समन्वय या प्रदर्शनातून साधण्यात आला.
हे प्रदर्शन केवळ कलाकृतींचे सादरीकरण न ठरता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणविषयक जाणीव आणि भारतीय कला-संस्कृतीविषयीच्या आदराचे प्रतिबिंब ठरले. निरीक्षण, संशोधन, स्वतंत्र विचार आणि कल्पनांना प्रत्यक्ष कलाकृतींचे रूप देण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे शिक्षण अधिक आनंददायी, अर्थपूर्ण आणि जीवनाशी या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी जोडले गेले.
Photo caption – अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अतुल जैन, डॉ. भावना जैन, मनोज परमार आणि स्कूलच्या शिक्षिका









