१७ वर्षांखालील मुलींच्या संघाची प्रथम क्रमांकासह विभागीय स्पर्धेसाठी निवड
भुसावळ : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाने जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयासह संघाने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले असून विभागीय स्तरावरील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेसाठीही आपली निवड निश्चित केली आहे.


जामनेर येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, चपळता, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना मात देत विजेतेपद मिळविले.
खेळाडूंनी मैदानावर दाखविलेली शिस्त, आक्रमक खेळशैली आणि विजयासाठीची चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली.या विजयामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून आता विभागीय स्तरावर होणार्या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या संघाला मिळणार आहे. जिल्हास्तरीय यशानंतर विभागीय स्पर्धेतही अशीच चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि शिक्षकवृंद यांच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.









