जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने


आमदार राजूमामा भोळेंच्या पाठपुराव्याला यश; नवीन उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या पात्र नवीन, विस्तारीकरण आणि विविधीकरण उद्योग घटकांना विदर्भ-मराठवाडा क्षेत्राप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागाने ४ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला.
जळगाव जिल्ह्याला औद्योगिक प्रोत्साहनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. संपूर्ण जिल्ह्याला घोषित करण्यात आलेल्या ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली होती. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने या प्रयत्नांना यश आले आहे.
शासन निर्णयानुसार, पात्र सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे, विशेष मोठे, विशाल आणि अतिविशाल उद्योग घटकांना नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव व धुळे या वर्गीकृत क्षेत्रांप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ मिळणार आहेत. मात्र, संबंधित उद्योगांना गुंतवणूक व रोजगारनिर्मितीचे निर्धारित निकष तसेच योजनेतील अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यात नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार आणि औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. औद्योगिक वसाहती आणि नवउद्योजकांनाही या निर्णयाचा लाभ होऊ शकतो.
या निर्णयाबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









