रोकड, चांदीचे दागिने, मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत
जळगाव प्रतिनिधी) – रामानंद नगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत एका संशयितास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीतील रोकड, चांदीचे दागिने, मोबाईल फोन, कपडे, कॉस्मेटिक साहित्य आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रामानंद नगर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीनगर परिसरातील प्लॉट क्रमांक २४ जे/के, जैन स्थानक भवन, गुलमोहर हाउसिंग सोसायटी येथील रहिवासी गोविंद गायकवाड हे दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संपूर्ण कुटुंबासह घराला कुलूप लावून सुरभी लॉन रोड, जळगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी रात्री अडीच वाजता ते घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले.
घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील ३९ हजार ५०० रुपये रोख, १० भार चांदी, ७ भार चांदीचे वाळे, ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, कपडे, कॉस्मेटिक साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २७३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास अधिकारी व पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तसेच तीन दिवसांपूर्वी एमपीडीएची शिक्षा भोगून येरवडा कारागृहातून बाहेर आलेला समीर हनिफ काकर याचा शोध घेतला. समीर काकर याच्याविरुद्ध एकूण १३ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तपासादरम्यान समीर हनिफ काकर याला त्याचा साथीदार सचिन शंकर साळुंखे, दोघेही रा. तांबापुरा, जळगाव यांच्यासह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आली. रिमांडदरम्यान आरोपींकडून मोबाईल, कॉस्मेटिक सामान, कपडे, बेडशीट साहित्य, चांदीचे जोडवे, ५ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वारंगे, पोउपनि सचिन रणशिवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, योगेश वारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकेश गवते आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.









