टीबी सेंटर येथील नवीन डेपोचे ९५ टक्के काम पूर्ण; उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र एका महिन्याच्या आत बंद करून ते टीबी सेंटर येथील कचरा संकलन डेपोत स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी टीबी सेंटर येथील सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी या कामाचा आढावा घेतला.


विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर मनपा प्रशासन व पदाधिकारी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) तसेच गव्हर्मेंट आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आयटीआय परिसरातील कचरा डेपो हटविण्याची आक्रमक मागणी केली होती.
विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र एका महिन्याच्या आत बंद करण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या आश्वासनानुसार टीबी सेंटर परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन कचरा संकलन केंद्राच्या कामाची पाहणी करण्यात आली. सध्या या केंद्राचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ५ टक्के काम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती संबंधित मक्तेदाराचे इंजिनिअर आणि मनपा इंजिनिअर यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
या कामाचा सविस्तर आढावा मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र पूर्णपणे बंद करून दिलेल्या मुदतीत कचरा संकलनाची प्रक्रिया टीबी सेंटर येथील नवीन केंद्रातून सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
या पाहणीवेळी प्रकल्प प्रमुख योगेश वाणी, संबंधित ठेकेदारांचे इंजिनिअर तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे पीएमसी कर्मचारी उपस्थित होते.








