भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील धक्कादायक घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राचा गळा आवळून व जमिनीवर डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला आणि आपल्या हातून मित्राचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवन अनिल सोनावणे (वय ३०, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) आणि मयत राहुल सदाशिव धांडे (वय ३५) हे एकमेकांचे मित्र होते. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पवन सोनावणे हा रेल्वेतून पडला होता. त्यानंतर तो विक्षिप्त व रागीटपणे वागत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, काल रात्री दोघेही भुसावळ रेल्वे स्थानकाच्या पलीकडे असलेल्या अंधाऱ्या परिसरात दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पित असताना राहुल धांडे याने पवन सोनावणे याला शिवीगाळ केली. यावरून पवन संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने रुमालाने राहुलचा गळा आवळला तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटनेनंतर आरोपी पवन सोनावणे हा आज सकाळी स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात आला. त्याने आपल्या हातून मित्राचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
आरोपी पवन सोनावणे हा मागील महिन्यापर्यंत रेल्वेत चणे-फुटाणे विकण्याचे काम करत होता, तर मयत राहुल सदाशिव धांडे हा भुसावळ रेल्वे स्थानकावर साफसफाईसह इतर कामे करत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









