तीन वेगवेगळ्या घटनांत गुन्हे दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळूची ट्रक, ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरात आणि परिसरात उघडकीस आलेल्या या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्हापेठ, रामानंदनगर आणि एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


गुरुवारी सकाळी ५:५० वाजेच्या सुमारास खोटेनगरकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या एका संशयास्पद ट्रकला (एमएच ई ७३७२) जिल्हापेठ पोलिसांनी आयटीआयजवळ थांबवले. वाहनाच्या तपासणीत १४ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू आणि परवाना नसल्याचे समोर आले. या कारवाईत ट्रकलाह ९ हजार रुपयांचा मोबाईल व वाळू असा एकूण ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जगदीश कोळी (वय ३२), पुरुषोत्तम सोनवणे (वय २०), दिनेश नन्नवरे आणि प्रवीण बाविस्कर (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक फौजदार संजय सोनवणे पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, गुरुवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा शिवारात गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या एक ब्रास वाळू वाहून नेणारा ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ७५३८) पकडण्यात आला. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने उत्तम खैरे (वय ४१, रा. सावखेडा) याच्याविरुद्ध गौण खनिज विकास व नियमन अधिनियमानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास हवालदार जितेंद्र राजपूत करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, बुधवारी रात्र ते गुरुवारी सकाळच्या दरम्यान दापोरी (ता. एरंडोल) शिवारात तहसीलदार यांच्या गस्ती पथकाने १५ हजार रुपयांची वाळू वाहून नेणारा एक डंपर (एमएच २१ बीएच २६३४) पकडला. पथकाने ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असता, अज्ञात चालकाने डंपर पळवून नेला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार किरण पाटील तपास करत आहेत.









