जळगावमधील लक्ष्मी नगरातील दुर्दैवी घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात अवघ्या १२ वर्षांच्या एका शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. खेळण्या-बागडण्याच्या वयात रोहित राहुल चौधरी (वय १२, मूळ रा. लक्ष्मी नगर, जळगाव) या चिमुकल्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


रोहित हा भुसावळ येथील एका वसतिगृहात राहून सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगावला आपल्या घरी आला होता. रोहितच्या वडिलांनी नुकतेच शहरातील खडके चाळ भागात एक नवीन घर घेतले आहे. ९ सप्टेंबरच्या रात्री जेवण झाल्यानंतर रोहित ‘मी नव्या घरात झोपायला जातो’ असे सांगून खडके चाळ येथील घरी गेला होता.
शुक्रवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास रोहितची आई रूपाली या नव्या घरात गेल्या असता, रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आईच्या आक्रोशानंतर शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत रोहितला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
रोहितचे वडील राहुल चौधरी हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या अचानक जाण्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









