गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी घेतली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची
बैठकजळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेचा मानाचा गणपती असल्याने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी मनपाच्या मानाच्या गणपतीच्या आगमन व विसर्जन सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक उपस्थितांसमोर मांडले.
गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहपरिवार आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले.


उत्सवाच्या दहा दिवसांत नागरिकांमध्ये विविध सामाजिक विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जळगावकरांनी आणि मनपा परिवाराने हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
शहर सौंदर्यीकरण व वाहतूक नियोजनाच्या सूचना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आगमन व विसर्जन मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, गर्दीच्या काळात शहरात ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी या उत्सवात उस्फूर्तपणे सहभागी होताना आपापसातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही महापौर दीपमाला काळे यांनी केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









