मुक्ताईनगर तालुक्यातील दुई गावाजवळील घटना; वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, चालकाचा शोध सुरू
मुक्ताईनगर, ( प्रतिनिधी ) : मुक्ताईनगर तालुक्यातील दुई गावाजवळ पुणार्ड फाटा परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ५६ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस नोंदीनुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान पुणार्ड फाटा ते कुऱ्हा रस्त्यावर दुई गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत छाया मोतीराम पाटील (वय ४४, रा. दही, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला. तर शोभा कडू पाटील (वय ५६, रा. दही, ता. मुक्ताईनगर) या गंभीर जखमी झाल्या.
या प्रकरणी भागवत ज्ञानेश्वर पाटील (वय २५, व्यवसाय – खासगी नोकरी, ह.मु. बालाजी नगर, चाकण, पुणे; मूळ रा. दुई, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने अतिवेगाने चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यावेळी वाहनाने छाया मोतीराम पाटील व शोभा कडू पाटील यांना धडक दिली. या अपघातात छाया पाटील यांच्या मृत्यूस तसेच शोभा पाटील यांच्या गंभीर दुखापतीस संबंधित अज्ञात वाहन चालक कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0347/2026 दाखल करण्यात आला आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 134(ब) व 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिस नोंदीत नमूद असून, आरोपी वाहन चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेनंतर पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध सुरू केला आहे. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१३०१ राजकुमार चव्हाण, मुक्ताईनगर पोलिस ठाणे, करीत आहेत. मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.








