दोन अनोळखी इसमांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता ते जळगाव शहरातील वाघनगर भागात गिरणा पंपिंग रोडवरून गुलमोहर कॉलनीकडे पायी जात होते. यावेळी जय भवानी कटर्सजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
या दोघांनी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून येत, “भोलेनाथ का मंदिर कहाँ है?” असा पत्ता विचारला. त्यानंतर हातचलाखी करून फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटात असलेली १० ग्रॅम वजनाची, मध्ये पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी काढून घेतली.
फिर्यादीच्या लक्षात येण्यापूर्वीच दोन्ही संशयित वाहनातून पसार झाले. या सोन्याच्या अंगठीची अंदाजे किंमत १० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर फिर्यादी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस नोंदीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार, रामानंदनगर पोलिस ठाणे, करीत आहेत.









