जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती नगर परिसरातून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन व्यावसायिक मशीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर येथील रहिवासी व प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर संदीप दिनकर पाटील (वय ४८) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. संदीप पाटील यांनी गुरुवारी (दि. २०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गणपती नगरातील शालीमार अपार्टमेंटजवळ रस्त्यावर कामाच्या ठिकाणी आपल्या मशीन ठेवल्या होत्या. सकाळी ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून २५ हजार रुपये किमतीची ‘युरी’ कंपनीची काँक्रीट डबल पिस्टन ब्रेकर मशीन आणि ७ हजार रुपये किमतीची ‘केपीटी’ कंपनीची ड्रिल मशीन असा एकूण ३२ हजार रुपयांचा माल चोरून नेला.
कामकाजाच्या ठिकाणी मशीन न दिसल्याने पाटील यांनी शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि. २१) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत (बॅच नं. ९७ build) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









