मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात


रामानंद नगर पोलिसांची कामगिरी; सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणातून चोरीचा छडा
जळगाव | प्रतिनिधी : रामानंद नगर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत अवघ्या काही दिवसांत दोन महागड्या मशीन हस्तगत करून गुन्ह्याचा छडा लावला आहे. रामानंद बसस्टॉपच्या मागील परिसरातील मंगलमूर्ती हाइट्स येथील पार्किंगमधून तब्बल ३२ हजार रुपये किमतीच्या दोन मशीन चोरीला गेल्या होत्या.
दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून क्रॉक्रीट डबल पिस्टल ब्रेकर आणि केपीटी कंपनीची ड्रिल मशीन चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना दोन संशयितांची माहिती मिळाली.
पोलिसांनी गोलू उर्फ सुरेश वाघ आणि कैलास अनिल मिस्तरी, दोघेही रा. धनगरवाडा, हरीविठ्ठलनगर, जळगाव, यांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या दोन्ही मशीन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
रामानंद नगर पोलिसांनी या कारवाईत ३२ हजार रुपये किमतीच्या दोन मशीन हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये एक क्रॉक्रीट डबल पिस्टल ब्रेकर आणि एक केपीटी कंपनीची ड्रिल मशीनचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, पोना योगेश बारी, पोका मनोज मन, मुकुंद गवते आणि सुमेध इंधाटे यांनी केली.
पुढील तपास सुरू
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका जितेंद्र राजपूत करीत आहेत. चोरीच्या या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचा पोलीस तपास सुरू आहे.









