सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास


निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिर्डी बुद्रुक येथील शेतकरी प्रदीप अशोक महाजन (वय ३२) यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान मुलांच्या कानातील बाळ्या, २० ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे व चैन यांचा समावेश आहे. यासोबतच १ लाख २७ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली.
सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(३) नुसार घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ममता तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.









