दोन आरोपी अटकेत; सोन्याची चैन आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी एक दिवसांची कोठडी
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील शिक्षक कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत रोख रकमेसह सोन्याचे विविध दागिने हस्तगत केले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ७८ हजार ७९० रुपये असल्याचे समोर आले आहे.आरोपींना आज न्यायालयात हजार केले असता त्यांना एक दिवसांची कोठडी मिळाली आहे.



या प्रकरणात स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर यांच्या शिरसोली येथील घरात ३० एप्रिल ते ५ मे २०२६ दरम्यान चोरी झाली होती. घरातील सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज व रोकड चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (२२, रा. ढोलकपूर, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (२३, रा. तांबापुरा, जळगाव ) यांना अटक केली आहे. चौकशीत चोरीच्या मुद्देमालाबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची जप्ती सुरू केली.
मुन्ना शहा याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात आणून दिलेली १० हजार रुपयांची रोकड पंचांसमक्ष BNSS कलम १८५ अन्वये जप्त करण्यात आली. तर आरोपी मुस्तकीन याने चोरीचे काही दागिने घरी असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या वडिलांकडून सोन्याची २१.७७० ग्रॅम वजनाची काळ्या मण्यांसह फॅन्सी पट्टीची पोत, ५.०१० ग्रॅम वजनाचे फॅन्सी पदक आणि खड्यांसह २.७८० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या रिंग जप्त करण्यात आल्या.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. आरोपी मुस्तकीन याने चोरीतील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र सोनाराला विकले होते. पोलिसांनी संबंधित सोनाराकडून हे मंगळसूत्र हस्तगत केले असून त्याची अंदाजे किंमत ७० हजार रुपये किंमत आहे.
दरम्यान, चोरीला गेलेल्या मुद्देमालातील १५ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अद्याप हस्तगत झालेली नाही. ही चैन कुठे ठेवली किंवा कोणाकडे दिली याबाबत आरोपी मुस्तकीनकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, दोन्ही आरोपींनी संगनमताने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मुस्तकीनचे आणखी साथीदार आहेत का, तसेच जळगाव शहर आणि परिसरात अशाच प्रकारच्या इतर घरफोड्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. गुन्ह्यातील संभाव्य तिसऱ्या आरोपीबाबतही मुस्तकीनकडे चौकशी करण्यात येत आहे.
उर्वरित सोन्याची चैन हस्तगत करणे, चोरीच्या मुद्देमालाची पूर्ण जप्ती करणे, दागिन्यांची खात्री करणे तसेच संभाव्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपी मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा याची तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मागितली होती .मात्र न्यायमूर्ती श्रीमती डी. ए. सरनायक यांच्या कोर्टात हजर केले असता त्यानी या दोन्ही संशियीत आरोपींना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक एम. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे









