कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण


भुसावळ : कंत्राटी कामातील पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून एका तरुणावर लोखंडी कटरने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना तालुक्यातील खडका गावात घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन भगवान आमले (वय २०, रा. खडका, ता. भुसावळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंत्राटी कामात फिर्यादी आणि संशयित हे भागीदार असल्याने पैशांच्या देवाण-घेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला होता.
या वादातून गिरीश तायडे, अनिकेत सोनवणे, धिरज सोनवणे, सम्राट सपकाळे आणि यश सपकाळे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर संशयित क्रमांक तीनने हातातील छोट्या कटरने दर्शन आमले यांच्या छातीवर वार करून जखमी केले. यानंतर संशयितांनी फिर्यादीच्या आई, भाऊ आणि काकांनाही चापट्या-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीनंतर संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात BNS कलम 189(2), 191(2), 352, 351(3), 115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. योगेश भानुदास पालवे करीत आहेत.









