सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी


भुसावळातील दिपनगर औष्णिक केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्प परिसरातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ : दिपनगर येथील औष्णिक केंद्राच्या सोलार प्लांट परिसरातून १० हजार ५०० रुपये किमतीची सुमारे १५ किलो तांब्याची जुनी वापरातील तार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान दिपनगर औष्णिक केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्प परिसरात ही चोरी झाली. ५०० मेगावॅट प्रकल्पातून ६०० मेगावॅट प्रकल्पाच्या दरम्यान असलेल्या सोलार प्लांट परिसरातून अज्ञात व्यक्तींनी तांब्याची तार चोरून नेल्याचे समोर आले.
या प्रकरणी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी बंडू रतन पातोडे (वय ४४, रा. दिपनगर कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दिपक संजय जयतकर (वय २८) आणि शैलेश अशोक तुसकर (वय ३०, दोघे रा. फेकरी, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही संशयितांनी फिर्यादीच्या परवानगीशिवाय व लबाडीच्या उद्देशाने १५ किलो तांब्याची तार चोरून नेली. चोरी केलेला माल घेऊन जात असताना दोघे मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तांब्याच्या तारची अंदाजे किंमत १० हजार ५०० रुपये आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. योगेश भानुदास पालवे करीत आहेत. या चोरीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच चोरीचा माल कुठे नेण्यात आला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.









