मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!


जळगाव जिल्हा न्यायालयाचा निर्णय : २० हजार रुपयांचा दंड; अल्पवयीन मुलाची साक्ष ठरली निर्णायक
जळगाव : मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादातून सख्ख्या भावजयीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची सुनावली आहे. तसेच आरोपीला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिपक लोटन सोनार असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. चार वर्षांनंतर लागलेल्या या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनी येथे 21 मे 2022 रोजी ही थरारक घटना घडली होती. मृत योगिता मुकेश सोनार आणि त्यांचा सख्खा दीर दिपक लोटन सोनार यांच्यात मालमत्तेच्या कागदपत्रांवरून वाद सुरू होता. 21 मे 2022 च्या रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा वाद अचानक विकोपाला गेला. रागाच्या भरात दिपक याने घरात असलेली कुऱ्हाड काढून योगिता यांच्या डोक्यात सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कुऱ्हाड घटनास्थळीच फेकून पसार झाला होता.
अल्पवयीन मुलाच्या साक्षीने सुटला गुंता!
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वाची व निर्णायक ठरली. आईवर डोळ्यांदेखत झालेला हल्ला मुलाने न्यायालयात मांडल्याने आरोपीचा गुन्हा सिद्ध होण्यास मोठी मदत झाली.
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासले. यामध्ये पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.
न्यायालयाचा दणका
सरकारी वकिलांनी मांडलेला सबळ युक्तिवाद आणि पोलीस तपासातील भक्कम पुरावे ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी आरोपी दिपक सोनार याला हत्येच्या गुन्ह्यात दोषी धरले. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.









