जळगावात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
दुपारनंतर किंवा सायंकाळी सरींची शक्यता; ११ ते १५ ऑगस्टदरम्यानही हलक्या पावसाचा अंदाज


जळगाव : जिल्ह्यात वातावरणातील आर्द्रता कायम असल्याने आज, सोमवार (दि. १०) दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दिवसभर उकाडा, वातावरण ढगाळ
रविवारी जळगाव शहराचे कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळच्या वेळी हवेतील आर्द्रता तब्बल ९१ टक्के, तर सायंकाळी ६६ टक्के होती. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत असतानाच आकाश ढगाळ राहिले.
१५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळी पाऊस तसेच मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दि. ११ ते १५ ऑगस्टदरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.









