दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

शिरसोली परिसरातील घटना; पोलिसांकडून शोध सुरु
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली परिसरातून दोन अल्पवयीन बहिणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी मोठी मुलगी वय १६ वर्षे ४ महिने आणि दुसरी वय १२ वर्षे १ महिना या दोघी घरीच होत्या.कामावर असताना नातेवाईकांचा फोन आल्यानंतर दोन्ही मुली घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईकांसह परिसरात शोध घेतला असता दोघींचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून दोन्ही मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील पुढील तपास करीत आहेत.









