विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मल्हारपुरा भागात घरात खेळत असताना फ्रीजला स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत बालकाचे नाव पार्थ ब्रम्हकुमार पाटील (वय ७) असे आहे. तो पहिली इयत्तेत शिक्षण घेत होता. दुपारच्या सुमारास तो घरात खेळत असताना अचानक फ्रीजला स्पर्श झाला. त्यावेळी फ्रीजमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. ही घटना पाहताच त्याच्या आजीने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसून त्या दूर फेकल्या गेल्या.
घटनेनंतर कुटुंबीयांनी पार्थला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येकजण या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहे.
पार्थच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून त्याची आई एकटीच कुटुंबाचा सांभाळ करत होती. पार्थला एक भाऊ आणि एक बहीण आहे. एकुलत्या आधारासारखा असलेला मुलगा अचानक निघून गेल्याने आईने रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू आणणारा ठरला. या दुर्दैवी घटनेमुळे मल्हारपुरा परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.









