पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून लोखंडी रिंगा व ब्रेकर मशीनची चोरी; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा शहरातील गणेश कॉलनी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञातरीत्या शेडचे कुलूप तोडून तब्बल ८० हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फैजल सय्यद मजहरअली (वय ३२, व्यवसाय- बांधकाम ठेकेदार, रा. शेतपुरा, चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, दि. २ जुलै रोजी रात्री ८ ते ३ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान गणेश कॉलनी येथील बांधकामस्थळी उभारलेल्या पत्र्याच्या तात्पुरत्या शेडचे कुलूप तोडून त्यामधील ७० हजार रुपये किमतीच्या लोखंडी रिंगा तसेच १० हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी मुकेश आबा बारेला (रा. बोरअंजटी, ता. चोपडा) व अनिल रायसिंग भंगारवाला (रा. शेतपुरा, चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(४) व ३(५) अन्वये चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष ज्योतीराम पारधी करीत असून, संशयितांचा शोध सुरू आहे. घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.









