दोन अज्ञात दुचाकीस्वारांचा धाडसी प्रकार; शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात भररस्त्यात पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ७६ हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलिमा विकास बागड (वय ५२, व्यवसाय-गृहिणी, रा. सप्तशृंगी नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) या गुरुवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी सुमारे ७.२० वाजेच्या सुमारास बाजार करून घरी पायी जात होत्या.
त्यावेळी लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची, ७६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि भरधाव वेगाने भडगाव रोडच्या दिशेने पलायन केले.
या घटनेनंतर नीलिमा बागडे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) व ३(५) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









