कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
ग्रामपंचायत गाढ झोपेत ; शिरसोलीत ग्रामस्थ आक्रमक,तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यालगत असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ते तात्काळ पाडून अन्य योग्य ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून , तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

इंदिरानगर परिसरातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातून येणाऱ्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून मैला बाहेर पडत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या जीर्ण शौचालयाच्या बाजूलाच खोखली मातेचे मंदिर असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे. त्यामुळे हे शौचालय सध्याच्या जागी असणे नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे. यापूर्वी या शौचालयाच्या उघड्या खड्ड्यात एक गाय पडून गंभीर जखमी झाल्याची घटना देखील घडली होती. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी तिची सुटका केली होती,
मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.शौचालय पूर्णपणे जीर्ण झाल्याने भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, हे शौचालय पाडून अन्यत्र नव्याने उभारावे, अन्यथा येत्या काही दिवसांत ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.









