मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिर परिसरातून बांधकामासाठी ठेवण्यात आलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची दोन क्विंटल लोखंडी आसारी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत मुक्ताबाई मंदिर परिसरात भक्त निवासाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी मोकळ्या जागेत लोखंडी आसारी ठेवण्यात आली होती. २२ जून रोजी दुपारी साडेएक वाजेच्या सुमारास ही आसारी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी मंदिराचे पुजारी उद्धव नारायण जुनारे (वय ५७, रा. जुने कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शिवाजी रामलाल घोंगरे (रा. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) व एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिर व्यवस्थापनाची परवानगी अथवा संमती न घेता लोखंडी आसारी चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संदीप वानखेडे करीत आहेत.









