सराईत गुन्हेगार, गँग सदस्य व संशयितांवर विशेष कारवाई; अनेकांची चौकशी सुरू
जळगाव, ( प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाने शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध आज पहाटेपासून विशेष धडक कारवाई सुरू केली आहे. पहाटे सुमारे चार वाजेपासून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत सराईत गुन्हेगार, गँग सदस्य तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयित व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले आहे.


या विशेष कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दंगल नियंत्रण पथक (RCP) तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
कारवाईदरम्यान संशयित व सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानी झडती घेण्यात येत असून वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. मालकीबाबत शंका असलेली किंवा संशयास्पद वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहेत.
दरम्यान, अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात येत असून, प्राप्त माहितीनुसार प्रतिबंधात्मक कारवाई तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गुन्हेगारीवर अंकुशासाठी पोलिसांचा निर्धार
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.
बॉक्स न्यूज :
कारवाईची वेळ : पहाटे ४.०० वाजेपासून
स्थळ : जळगाव शहर
लक्ष्य : सराईत गुन्हेगार, गँग सदस्य व संशयित
सहभाग : जिल्हा पोलीस दल, RCP, स्थानिक पोलीस
कारवाई : झडती, वाहन तपासणी, चौकशी व प्रतिबंधात्मक उपाययोजना
उद्देश : गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था मजबूत करणे.









