१७.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त; मुख्य आरोपी फरार, गुन्हा दाखल
शिरपूर,ता.धुळे ( प्रतिनिधी ) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडसी कारवाईत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेला बनावट देशीदारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य, वाहन आणि तयार मद्यासह एकूण १७ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका हाडाखेड येथील पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिरपूर तालुक्यातील घाबापाडा शिवार, घाबदेवी पाडा रोड परिसरातील एका घरावर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. यावेळी तेथे बनावट देशीदारू तयार करण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान ९० मिली क्षमतेच्या १८ हजार सीलबंद बाटल्या (१८० बॉक्स), दोन कॅप सीलिंग मशिन, ४०० लिटर तयार देशीदारू, स्पिरीट वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक ड्रम, १० हजार रिकाम्या बाटल्या तसेच मद्यनिर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय वाहतुकीसाठी वापरले जाणारे पिकअप वाहन (MH-18-BG-5456) देखील ताब्यात घेण्यात आले.
कारवाईनंतर बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून, घरमालक व बनावट मद्य व्यवसायाशी संबंधित मुख्य आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई दुय्यम निरीक्षक संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भरारी पथकाने सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
जनतेला आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर अथवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









