पारोळा पोलीस स्टेशनला नराधमाविरुद्ध गुन्हा
पारोळा (प्रतिनिधी):- तालुक्यातील अमळनेर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ महिलेला गाठून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात एका संशयित नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने पीडितेला आणि तिच्या १४ वर्षीय मुलीला जिवंत मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


पेट्रोल पंपाजवळील शेतात कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय महिला अमळनेर रोडवर आपल्या मुलीसह वास्तव्याला आहे. दिनांक ९ जून २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी कृष्णा आनंदा घिसाडी (रा. मोढाळे, ता. पारोळा) याने पीडितेला अमळनेर रोडवरील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.
जबरदस्तीने अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग
संशयित कृष्णा घिसाडी याने पीडितेला शिवीगाळ करत, तिचा हात पकडून बळजबरीने जवळच असलेल्या शेतात ओढत नेले. तिथे तिची इच्छा नसताना, संगनमताशिवाय तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. गुन्ह्यानंतर आरोपीने पीडितेला पोलिसांत न जाण्यासाठी भयानक धमकी दिली. “तू जर या प्रकाराबाबत पोलिसांना किंवा कोणाला सांगितले, तर मी आत्महत्या करीन आणि चिठ्ठीत तुझे नाव लिहून तुला खोट्या केसमध्ये अडकवीन,” असे त्याने म्हटले. एवढेच नव्हे तर, “तू जर माझ्या नादी लागलीस, तर तुझ्यावर आणि तुझ्या १४ वर्षांच्या मुलीवर पुन्हा बलात्कार करीन व तुम्हा दोघांना जिवंत मारून टाकीन,” अशी धमकी दिली.
पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रसंगानंतर घाबरलेल्या पीडितेने १० जून २०२६ रोजी रात्री २३:३५ वाजता पारोळा पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कृष्णा आनंदा घिसाडी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) विजय भोंबे करत आहे.









