जळगाव ( प्रतिनिधी ) – अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत चालणारा मार्ग जैन धर्मात मोक्षमार्ग म्हणून ओळखला जातो. अध्यात्मिक ज्ञान, आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरेशी संबंधित या पवित्र प्रवासांना तीर्थयात्रा म्हटले जाते. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांनी केलेली शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा ही सर्व तीर्थयात्रांमधील तीर्थाधिराज यात्रा मानली जाते.


याच पवित्र यात्रेचा पुण्यलाभ जळगाव येथील ऑरेंज फोटोग्राफीचे संचालक श्री. धर्मेंद्र (धर्मेश) गोसर यांचे सुपुत्र, २४ वर्षीय चि. तुमित गोसर यांनी प्राप्त केला. त्यांनी सूर्यास्तापूर्वी एकाच वेळचे भोजन करण्याचा नियम पाळत सलग ९९ यात्रा पूर्ण केल्या आणि त्यानंतरही पुढे जाऊन १०८ पवित्र यात्रा पूर्ण करून विशेष पुण्यसंचय प्राप्त केला. या कालावधीत यात्रेकरू चि. तुमित यांनी शेवटच्या दोन दिवसांची यात्रा अन्न व पाण्याचा त्याग करून पूर्ण केली आणि या दोन दिवसांत ७ यात्रा पूर्ण केल्या.
परम पूज्य समवर प्रभजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या शिष्या परम पूज्य विरती प्रभाजी महाराज साहेब आणि परम पूज्य उदय प्रभाजी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात, केसरी समाजाच्या सहकार्याने २४ एप्रिल २०२६ रोजी प्रारंभ झालेली ही पवित्र तीर्थयात्रा ७ जून २०२६ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली.
९ जून रोजी चि. तुमित यांचे तीर्थाधिराज यात्रेनंतर जळगाव येथे आगमन झाल्यावर गोसर परिवार, मित्रपरिवार तसेच सर्वधर्मीय समाजबांधवांनी रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जैन धर्मात ज्या पवित्र स्थळी तीर्थंकरांनी प्रवचन दिले, विहार केला आणि मोक्ष प्राप्त केला, त्या स्थळाला सर्वोच्च पवित्र मानले जाते. गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालीताणा हे असेच एक दिव्य तीर्थक्षेत्र असून ते भगवान आदिनाथांचे मोक्षधाम मानले जाते.
हे तीर्थक्षेत्र शाश्वत तीर्थ म्हणून ओळखले जाते. अनादिकालापासून अस्तित्वात असलेले हे तीर्थ अनंतकाळपर्यंत राहणार आहे. शत्रुंजय पर्वतावर हजारो साधू-साध्वींना मोक्षप्राप्ती झाल्यामुळे या भूमीच्या कणाकणात अपार पावित्र्य आणि अध्यात्मिक ऊर्जा सामावलेली आहे.
अनादी ते अनंत काळापर्यंतचे शाश्वत तीर्थ…
महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा !
भारतीय संस्कृतीत तीर्थयात्रांना अध्यात्मिक साधना, भक्ती आणि पुण्यसंचयाचा श्रेष्ठ मार्ग मानले जाते. साधू-संत तसेच धर्मप्रेमी भाविक नियमितपणे या यात्रांचे पालन करतात. या यात्रांचा थेट संबंध मोक्षप्राप्तीशी जोडला जातो. मात्र, केवळ मृत्यू म्हणजे मोक्ष नव्हे आणि मृत्यूनंतर केले जाणारे दानधर्म किंवा पूजाविधी म्हणजेही मोक्ष नव्हे. विज्ञान आणि धर्म दोन्ही मान्य करतात की शरीर नश्वर असते; परंतु जीवात्मा नवीन स्वरूपात पुनर्जन्म धारण करते. जन्म-मृत्यूचे हे अखंड चक्र अनादिकालापासून सुरू असून अनंतकाळापर्यंत चालणारे आहे. या चक्रातून मुक्त होण्यालाच जैन धर्मात मोक्ष म्हटले जाते. त्यामुळे जैन धर्माला मोक्षमार्ग असेही संबोधले जाते. अध्यात्मिक ज्ञान, आत्मकल्याण आणि कर्मनिर्जरेसाठी केल्या जाणाऱ्या या पवित्र प्रवासांना तीर्थयात्रा असे म्हणतात.
जैन धर्मातील ज्या पवित्र स्थळी तीर्थंकरांनी उपदेश दिला आणि मोक्ष प्राप्त केला, ती स्थळे अत्यंत पूजनीय मानली जातात. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालीताणा हे असेच एक सर्वोच्च पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथून प्रारंभ होणारी महातीर्थ शत्रुंजय नव्वाणू यात्रा ही सर्व तीर्थयात्रांमधील तीर्थाधिराज म्हणून मान्यता प्राप्त आहे.
चला जाणून घेऊया, या पवित्र तीर्थयात्रेविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती…
जैन धर्मातील सर्वोच्च तीर्थांमध्ये अग्रस्थानी असलेल्या शत्रुंजय नव्वाणू यात्रेचे विशेष महत्त्व आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ (ऋषभदेव भगवान) यांनी गेटी पग बाजूने शत्रुंजय तीर्थाला ९९ पूर्व वेळा यात्रा केल्याचे मानले जाते.
या यात्रेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व खालील मुद्द्यांवरून समजू शकते…
१) शाश्वत तीर्थ :- हे तीर्थ अनादिकालापासून अस्तित्वात असून अनंतकाळपर्यंत राहणार आहे.
२) मोक्षभूमी :- या पर्वताच्या कणाकणात पावित्र्य नांदते. येथे कोट्यवधी साधू-साध्वींनी निर्वाण (मोक्ष) प्राप्त केल्याचे मानले जाते.
३) असंख्य मंदिरे :- शत्रुंजय पर्वतरांगांवर सुमारे एक हजार मंदिरे आहेत. यापैकी अनेक मंदिरे हजारो वर्षे जुनी असून संगमरवरातून उभारलेली भव्य मंदिरेही येथे आहेत.
४) अंतर्गत विजय :- ‘शत्रुंजय’ म्हणजे अंतर्मनातील शत्रूंवर विजय मिळवणे. (जसे काम, क्रोध, मद, लोभ इत्यादी.)
५) दिव्य यात्रा :- ही यात्रा कर्मरूपी शत्रूंचा नाश आणि आत्ममुक्तीचे प्रतीक मानली जाते. मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३,७५० पायऱ्या चढाव्या लागतात. या यात्रेला सिद्धाचल यात्रा असेही म्हटले जाते.
६) पावित्र्याचे नियम :- या तीर्थक्षेत्राची दिव्यता कायम राखण्यासाठी पर्वतावर कोणतीही व्यावसायिक गतिविधी नाही तसेच येथे रात्री प्रवास करण्यास पूर्णतः मनाई आहे.
७) यात्रेचा कालावधी :- चातुर्मास वगळता वर्षातील कोणत्याही काळात ही पवित्र यात्रा करता येते. विशेषतः कार्तिक पौर्णिमेला या यात्रेला अधिक धार्मिक महत्त्व आहे.









