एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. जळगाव आणि धुळे येथील विविध ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मूळची धुळे येथील रहिवासी असलेली आणि सध्या जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात राहणारी एक २३ वर्षीय तरुणी घरकाम करते. या तरुणीला जळगावच्याच सुप्रीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या संशयित आरोपी शेख शाहीद फारूख याने लग्नाचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून संशयित शेख शाहीद याने १७ एप्रिल २०२४ ते १ मे २०२६ या कालावधीत पीडित तरुणीच्या जळगाव येथील घरात तसेच धुळे येथील देवपूर भागातील एका भाड्याच्या खोलीत तरुणीच्या संमतीशिवाय तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
संशयित आरोपीने वेळोवेळी लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीचे शारीरिक व मानसिक शोषण केले. मात्र, जेव्हा तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने लग्न करण्यास साफ नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने ८ जून २०२६ रोजी जळगाव गाठून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपबिती कथन केली. तरुणीच्या जबाबावरून ८ जून रोजी दुपारी २:५१ वाजता एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख शाहीद फारूख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत.









